रविवार, २४ मे, २०२०

by Updated on रविवार, २४ मे, २०२० 2 comments

किंडल ईबुक रिडर आणि किंडल ॲप बद्दल जाणून घ्या सर्व माहिती

तुम्ही किंडल इबुक रीडर आणि किंडल अँड्रॉइड ॲप बद्दल ऐकले असेल परंतु तुटक-तुटक माहितीमुळे कन्फ्युजन जास्त होते. आज मी तुम्हाला खात्री देतो की हि पोस्ट वाचल्यानंतर तुम्हाला किंडल ही काय भानगड आहे पूर्णपणेा समजेल आणि एकही शंका मनात राहणार नाही.

तर सुरू करूया ॲमेझॉन किंडल हि काय भानगड आहे समजून घेण्यासाठी.
everything about kindle eBook reader and app

किंडल ई-बुक रीडर डिवाइस

अमेझॉन किंडल चे दोन प्रकार आहेत.  पहिला प्रकार म्हणजे किंडल डिव्हाईस हे एक ई-बुक रीडर डिवाइस आहे जे  दिसायला एखाद्या अँड्रॉइड टॅबलेट सारखे दिसते परंतु पूर्णतः अँड्रॉइड टॅबलेट पासून वेगळे आहे. हे खास फक्त आणि फक्त पुस्तके वाचण्यासाठी ॲमेझॉन ने बनवलेले एक डिवाइस आहे ज्यामध्ये आपण केवळ पुस्तके वाचू शकता. यामध्ये कोणतेही ॲप इन्स्टॉल करू शकत नाही किंवा गाणी ऐकू शकत नाही. याची खासियत म्हणजे याची स्क्रीन. किंडल ची  स्क्रीन मोबाईलच्या एलसीडी डिस्प्ले पेक्षा पूर्णतः वेगळी आहे.  यामध्ये ईइंक प्रकारची स्क्रीन वापरली जाते जी आपल्याला कागदावरील शब्द वाचत असल्याचा भास निर्माण करते. किंडल पूर्णपणे ब्लॅक अँड व्हाईट स्क्रीन असतेे. 

अमेझॉन किंडल च्या स्क्रीन ची वैशिष्ट्ये म्हणजे तुम्ही सूर्यप्रकाशात देखील या वरील अक्षरे स्पष्टपणे वाचू शकता याच्या बॅकग्राऊंड मध्ये कोणतीही लाईट नसल्यामुळे डोळ्यांना अजिबात त्रास होत नाही आणि एकदा चार्ज केल्यानंतर याची बॅटरी जवळपास महिनाभर चालते. स्क्रीन हीच त्यांची सर्वात मोठी शक्ती आहे.  इतर कोणतीही ॲप नसल्यामुळे पुस्तक वाचताना मधेच कोणतेतरी नोटिफिकेशन, एखादा मेसेज किंवा आणखी कोणताही डिस्टर्बन्स होत नाही.

नवीन किंडल घेतल्यानंतर यामध्ये एकही पुस्तक पूर्वीपासून सेव्ह केलेले नसते. तुम्हाला सर्व पुस्तके नव्याने विकत घ्यावी लागतात.  किंडल डिवाइस विकत घेतल्यानंतर ऑफर म्हणून ॲमेझॉन तुम्हाला एक महिन्यापर्यंत आपण खरेदी केलेल्या सर्व पुस्तकांवर 50 टक्के इतका डिस्काउंट देते. परंतु त्यातील कोणतेही पुस्तक पूर्णपणे मोफत नसते.  


अमेझॉन किंडल अँड्रॉइड ॲप

आता प्रत्येकजणच काही अमेझॉन किंडल ई-बुक रीडर विकत घेऊ शकत नाही परंतु सर्वांकडे अँड्रॉइड मोबाईल असतोच आणि अमेझॉन किंडल अँड्रॉइड ॲप हे ज्यांच्याकडे रीडर डिवाइस नाही त्यांच्यासाठी ॲमेझॉन वरील पुस्तके वाचण्यासाठीची सुविधा आहे. किंडल रीडर ईंइंक डिवाइस आणि किंडल अँड्रॉइड ॲप यामध्ये असा फरक आहे.

पण जर समजा तुमच्याकडे ईइंक रीडर पण आहे आणि अँड्रॉईड मोबाईलमध्ये किंडल ॲप देखील आहे तर दोन्ही वरील ॲमेझॉन अकाउंट एकच असल्यास जी पुस्तके तुम्ही एका ठिकाणी विकत घेता ही पुस्तके तुम्ही मोबाईल आणि रीडर डिवाइस दोन्हीकडे वाचू शकता. वाचण्याची प्रत्येक पुस्तकाची वाचण्याची प्रगती दोन्हीकडे सिंक होते त्यामुळे जिथे तुम्ही थांबला आहात तिथून पुढे दुसऱ्या डिवाइस वरती वाचायला सुरु करू शकता. एक पुस्तक वारंवार विकत घेण्याची गरज नाही. एका ठिकाणी विकत घ्या आणि दोन्ही ठिकाणी वाचू शकता.


किंडल चे प्रकार

जसे मोबाईल चे विविध मॉडेल्स बाजारात उपलब्ध आहेत, तशाच प्रकारे किंडल ईबुक रीडर चे ३ वेगवेगळे मोडेल्स उपलब्ध आहेत. पहिला आहे किंडल बेसिक किंवा ज्याला All New Kindle म्हणतात. ज्याची किंमत ७९९९/- आहे. यानंतर आहे किंडल पेपरव्हाईट याची किंमत १२९९९/- आहे. आणि यापुढचे मोडेल आहे किंडल ओयासिस ज्याची किंमत २६९९९/- आहे. माझ्याकडे किंडल पेपरव्हाईट मॉडेल आहे. माझ्या मते पेपरव्हाईट हे सर्वात बेस्ट ऑप्शन आहे.
कारण याची स्क्रीन रीजोलुशन उत्कृष्ठ असून led front light चा पर्याय उपलब्ध आहे. किंमत देखील योग्य आहे. बेसिक किंडल मध्ये LED front light नाही पण bluetooth आहे ज्याचा वापर करून तुम्ही Audio ईबुक ऐकू शकता.  Amazon वर बेसिक किंडल वर बघण्यासाठी येथे क्लिक करा. किंडल पेपरव्हाईट बघण्यासाठी येथे क्लिक करा.

आता पुस्तकांबद्दल जाणून घेऊया

किंडल रीडरवर तुम्ही ॲमेझॉन वरून विकत घेतलेली सर्व पुस्तके वाचू शकता परंतु जर तुमच्याकडे पूर्वीपासून काही पुस्तके ईबुक स्वरुपात असतील तर तुम्ही तुमच्या कम्प्युटरवरून ॲमेझॉन किंडल मेमरी मध्ये कॉपी करून घेऊ शकता आणि त्यावर वाचू शकता.

किंडल रीडरवर तुम्ही पीडीएफ फाईल देखील वाचू शकता परंतु त्याचा एक्सपीरियंस एवढा चांगला नाही कारण की पीडीएफ ची पेज साईज आणि किंडल स्क्रीन साईज जुळत नाही आणि त्यामुळे इकडून तिकडे स्क्रोल करणे खूप अवघड जाते

किंडल रीडर वर जवळपास एक ते दोन हजार पुस्तके बसू शकतात. चार जीबी आणि आठ जीबी प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. आणि एका पुस्तकाची जास्तीत जास्त साईज दोन एमबी पर्यंत असते याचा हिशोब केला तर किमान दोन हजार पुस्तके सहज बसू शकतात


ॲमेझॉन प्राईम आणि किंडल अनलिमिटेड

जेव्हा तुम्ही अमेझॉन वर अकाउंट ओपन करता तेव्हा तुमच्या अकाउंट मध्ये कोणतेही पुस्तक नसते.  हे तेच काउंट जे तुम्ही ॲमेझॉन वरती शॉपिंग करण्यासाठी वापरता. तेच अकाउंट तुम्ही अमेझॉन किंडल रीडर डिवाइस आणि मोबाईल वरील किंडल मध्ये वापरू शकता.

इतर वस्तू जशा तुम्ही खरेदी करता त्याचप्रमाणे पुस्तके देखील खरेदी करावी लागतात. खरेदी करताना किंडल फॉर्मट सिलेक्ट करायला विसरू नका. नाहीतर पेपर हार्ड कॉपी खरेदी करू शकता.

एका ठिकाणी एकदा तुम्ही पुस्तक विकत घेतले किती पुस्तक तुमच्या अकाउंटला लिंक होते ज्यामुळे एका ठिकाणी पुस्तकांची खरेदी केली किती पुस्तक तुम्ही किंडल रीडर डिवाइस किंवा मोबाईलमध्ये सहजगत्या वाचू शकता. ते पुस्तक पुन्हा-पुन्हा विकत घेण्याची गरज नसते आणि पुस्तक कायमस्वरूपी तुमचे होऊन जाते.

बेसिक ॲमेझॉन अकाउंट मध्ये कोणते पुस्तक तुम्ही विकत घेतले नसते पण जेव्हा तुम्ही अमेझॉन प्राईम जे साधारण 999 रुपये प्रति वर्ष त्याची किंमत आहे हे जॉईन केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ, प्राईम म्युझिक तसेच प्राईम डिलिव्हरी या सुविधा मिळतात त्याच बरोबर त्याचबरोबर प्राईम अकाउंट सोबत प्राइम बुक्स ही सुविधा सुद्धा सोबत आलेली असते. 
यामध्ये अनेक पुस्तके मोफत उपलब्ध करून दिली जातात सुरुवातीच्या काळामध्ये मराठी पुस्तके कमी होती परंतु आता जवळजवळ सर्वच प्रसिद्ध पुस्तके यामध्ये उपलब्ध आहेत. जी तुम्ही पूर्णपणे मोफत वाचू शकता.  असे असले तरी नव्याने प्रसिद्ध झालेली मराठी पुस्तके यामध्ये समाविष्ट नसतात. याच्या पुढची स्टेप आहे ती म्हणजे किंडल अनलिमिटेड. 

किंडल अनलिमिटेडमध्ये किंडल प्राईम वर असणारी सर्व पुस्तके तर असतातच परंतु अमेझॉनच्या वेबसाईटवर उपलब्ध असणारी सर्व भाषेतील सर्व पुस्तके (काही अपवाद वगळता ज्याला तुम्ही नव्याण्णव टक्के इतकी म्हणू शकता) ही सर्व पुस्तके तुम्हाला पूर्णपणे मोफत वाचण्यास उपलब्ध केली जातात. किंडल अनलिमिटेडचे देखील तुम्हाला सबस्क्रीप्शन विकत घ्यावे लागते जे साधारण महिन्याला 170 रुपयांपर्यंत असते. 

एकदा तुम्ही हे सबस्क्रीप्शन घेतले की तुम्ही ॲमेझॉन वर उपलब्ध असलेली कोणतीही पुस्तके पूर्णपणे मोफत वाचू शकता. परंतु जेव्हा तुमचे सबस्क्रीप्शन संपेल त्या दिवसापासून ही पुस्तके तुमच्या अकाऊंटवरून आपोआप दिसणे बंद होते. जेव्हा तुम्ही नव्याने सबस्क्रीप्शन कराल  तेव्हा पुन्हा तुमची लिस्ट वाचण्यासाठी उपलब्ध होते. हे थोडक्यात ग्रंथालयात सभासदत्व घेतल्यासारखे आहे. सभासदत्व घ्या आणि कोणतेही पुस्तक तुमचे जोपर्यंत सभासदत्व आहे तोपर्यंत वाचा.


अमेझॉन किंडल वरती तुम्ही पूर्वीपासून तुमच्याकडे असणारी पुस्तके वाचू शकता का?

मोबाईल वरती बरेचसे ईबुक्स शेअर केली जातात तसेच अनेक वेबसाईट वरती ती ई-बुक्स डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असतात. ही पुस्तकेतुम्ही तुमच्या कम्प्युटरवर डाऊनलोड करून घेऊ शकता आणि तिथून युएसबी केबल ला जोडून किंडल चे मेमरी मध्ये कॉपी पेस्ट करू शकता.

पण लक्षात ठेवा की अमेझॉन किंडल वरती फक्त MOBI याप्रकारची ई-बुक्स तुम्ही वाचू शकता. 

परंतु वेबसाईट वरती उपलब्ध असणारी सर्व पुस्तके ही जास्तीत जास्त पुस्तके ही EPub या प्रकारची असल्यामुळे तुम्हाला ती पुस्तके किंडल वर ती पेस्ट करण्यापूर्वी फॉरमॅटमध्ये कन्व्हर्ट करावी लागतील. यासाठी तुम्ही Calibre हे मोफत असणारे सॉफ्टवेअर वापरू शकता.

कॅलिबर चा वापर करून तुम्ही विविध मराठी वर्तमानपत्रे उदाहरणात लोकसत्ता, ई सकाळ ही वर्तमानपत्रे रोजच्या रोज तुमच्या किंडल वरती ती वाचू शकता. तसेच इतर अनेक आंतरराष्ट्रीय व भारतीय इंग्रजी वर्तमानपत्र देखील वाचू शकता.  त्याचप्रमाणे तुम्हाला आवडलेले कोणतेही वेबसाईटचे वेब पेज, तुमचा आवडता ब्लॉग किंवा ऑनलाईन उपलब्ध असणारी इतर कोणतीही वाचनीय सामग्री ई-बुक मध्ये कन्व्हर्ट करून तुम्ही तुमच्या किंडल वरती वाचू शकता. तुम्ही स्वतः देखील बनवू शकता यासाठी कॅलिबर नावाचे सॉफ्टवेअर अत्यंत उपयोगी आहे. तुम्ही तुमच्या मायक्रोसोफ्ट वर्ड मध्ये टायपिंग केलेली फाईल देखील मध्ये कन्व्हर्ट करून किंडल वरती वाचू शकता. 


जर खरेदीच करायची असतील तर सरळ पेपर हार्ड कॉपी का खरेदी करू नये?

अनेकजण हा प्रश्न विचारतात. परंतु जर समजा तुम्ही कुठे फिरायला जाणार असाल, टूर वर असाल तर तुम्ही किती पुस्तके सोबत ठेऊ शकता? जास्तीजास्त २ ते ३. पण जर तुम्ही किंडल सोबत ठेवले तर तुमची आख्खी लायब्ररी सोबत असेल. 

तसेच, पुस्तकांच्या किमतीमधील फरक हा देखील खूप मोठा फॅकटर आहे. कितीतरी प्रसिद्ध मराठी पुस्तके केवळ २९/- रुपयाला उपलब्ध आहेत. सतत ईबुक चा सेल सुरु असतो त्यामध्ये यांची किंमत ८० ते ९०% कमी झालेली असते. एवढेच नाही तर सेल नसताना सुद्ध अनेक पुस्तके हि त्यांच्या छापील आवृत्तीच्या ८०% पेक्षा कमी किमतीत उपलब्ध असतात. एखादे छापील पुस्तक ५०० रुपयांना असेल तर तेच पुस्तक किंडल वर ५० रुपयांना असते. यावरून तुम्हाला कल्पना आली असेल कि किंडल खरेदी करणे फायद्याचे आहे.


आशा करतो की यामुळे तुमच्या बऱ्याच शंका निरसन झाले असतील याव्यतिरिक्त जर तुम्हाला कोणती शंका असेल किंवा वर्डची फाइल बुक मध्ये कशी कन्वर्ट करायची त्याचप्रमाणे वेबपेजेस कशी कन्वर्ट करायची किंवा स्वतःचे पुस्तक कसे बनवायचे याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास नक्की विचारा मी तुम्हाला मदत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करीन.

लेख आवडल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा.  काही शंका असल्यास कमेंट मध्ये विचारा...

२ टिप्पण्या:

  1. सर मी किंडल घेतल आहे , मराठी pdf upload केली तर ती चालत नाही , काही सुचवाल का

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. तुमच्याकडे PC असेल तर, Calibre वापरून PDF, MOBI format मध्ये convert करा. PDF साठी Kindle सपोर्ट खूप वाईट आहे. जास्त साईझ ची PDF असेल तर चालत नाही.
      2/3 MB पेक्षा जास्त साईझ असेल तर साईझ कमी करून पहा.

      हटवा